आपला विदर्भ

पांदण रस्त्यांसाठी पाच कोटी रु.निधी उपलब्ध करून देऊ..ना.वडेट्टीवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राच्या विविध विकास कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

ब्रम्हपुरी (चंद्रपूर) दि. 7 फेब्रुवारी : ब्रह्मपुरी क्षेत्रातील सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तहसीलअंतर्गत येणाऱ्या विविध विभागाचा आढावा राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागास वर्गीय, सामाजिक व शैक्षणिक विशेष मागास प्रवर्ग, भटक्‍या जाती,भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण, आपत्ती व्यवस्थापन तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी काल ब्रम्हपुरी येथे घेतला. यावेळी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील पांदण रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल ,असे त्यांनी स्पष्ट केले.

नामदार वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी येथे काल विश्रामगृहावर आले असता त्यांनी दुपारी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तहसिलदार व गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत विविध कामांचा आढावा घेतला.

यावेळी विभागातील पांदण रस्त्यांच्या निर्मिती आणि दुरुस्तीच्या संदर्भातील प्रश्न पुढे आला असता निधीअभावी ही कामे प्रलंबित राहू नये असे निर्देश त्यांनी दिले.या विधानसभा क्षेत्रातील शेतक-यानी मोठ्या प्रमाणात शेतीत जाण्यासाठी रस्त्यांची मागणी केली होती त्यामुळे पांदण रस्त्यांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. ब्रह्मपुरी येथील नाट्यगृह, बारई तलाव लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना केल्या. तलावाचे सौंदर्यीकरण व संरक्षण भिंत बांधण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले. ब्रम्हपुरी नगर पालीकेच्या 22 कोटी रुपयांच्या नळयोजनेचा आढावा घेतला.पॉलीटेक्नीक कॉलेजला पाणीपुरवठा व्यवस्थीत व्हावा असे निर्देश दिले तसेच सर्व क्रीडा संकुल पुर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.

सिंदेवाही येथील विश्रामगृह दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय वन जमीन पट्टे तसेच विविध ठिकाणच्या आवास योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अधिक काळ ताटकळत न ठेवता त्यांना मदत करण्याचे निर्देश यावेळी मंत्र्यांनी दिले. उपविभागातील तलाठी कार्यालय, त्यांची सद्यस्थिती व निर्मिती संदर्भातही त्यांनी यावेळी आढावा घेतला

असोलामेंढा पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांना बाबत माहिती जाणून घेतली. या पर्यटन स्थळाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या संदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक मदत करणे गरजेचे आहे. या मदतीच्या संदर्भातील निधी वितरण संदर्भात आज आढावा घेण्यात आला. सावली परिसरात या पावसाने सर्वाधिक नुकसान झाले असून 12856 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले असून 7272.90 हेक्टरवर नुकसान झाले होते. आतापर्यंत चार कोटीवर यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता.त्यापैकी 3 कोटी 87 लाख रूपये वाटप झाल्याचे यावेळी स्पष्ट केले.

ब्रह्मपुरी तालुक्यात देखील 4 हजार 339 शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आले होते. 3148 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यासाठी 1 कोटी 93 लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली होती. ब्रह्मपुरी तालुक्यातील किती शेतकऱ्यांना यावेळी मदत झाली याबाबतची माहिती त्यांनी घेतली. तसेच सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीचाही त्यांनी आढावा घेतला सिंदेवाही येथील राजीव गांधी भवन दुरुस्त करण्याबाबत त्यांनी यावेळी निर्देश केले. तसेच ब्रह्मपुरी येथील शासकीय वसतीगृह तयार करण्याच्या जागेबाबत ही आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *