आपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय

पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले.

राज्यात जुलै 2018 या महिन्यात होणाऱ्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे यासाठी काल मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशन, चित्रपट कलाकार आणि निर्माते यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह वरिष्ठ वन अधिकारी आणि चित्रपटक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्येचित्रपट निर्माते सुभाष घई, सिनेअभिनेत्री रविना टंडन, किरण शांताराम, मुकेश भट, नितीन दातार, वितरक रमेश सिप्पी, कुलमीत मक्कर, जयमेन पांचाल, थॉमस डिसुझा, कॅप्टन बलदेव सिंग, प्रकाश चाफळकर, सिद्धार्थ रॉय-कपूर, मिलन लुथारिया, कमलकुमार, उज्वल मेहता आदी मान्यवरांचा सहभाग होता.

चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचे अनुकरण करणारे, त्यांना फॉलो करणारे लाखो चाहते असतात. त्यामुळे या लोकांनी जर हरित मिशनसाठी संदेश दिले तर ते त्यांच्या लाखो आणि करोडो चाहत्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी पुढे येऊन यात सहभाग नोंदवावा असे सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात 48 लाख लोक ग्रीन आर्मी मध्ये सहभागी झाले आहेत. त्यामध्ये 20264 लोक हे अभियंते, 5741 लोक डॉक्टर, 16 हजार 483 लोक हे आय.टी क्षेत्रातील मान्यवर तर 1107 लोक पीए.डी धारक आहेत. वृक्षलागवड कार्यक्रमास समाजाच्या सर्व स्तरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. 48 लाख लोकांपैकी 26 लाख लोकांचे मोबाईल नंबर हरित सेनेमध्ये रजिस्टर झाले असल्याने या 26 लाख लोकांपर्यंत विभाग थेट पोहोचू शकत आहे, हरित महाराष्ट्राचे उपक्रम थेट त्यांना कळवू शकत आहे.

शासनाने राज्यातील हरित क्षेत्र वाढावे यासाठी अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगून ते म्हणाले की, सीएसआर प्रमाणे आता सीईआर ही संकल्पना केंद्र शासनाने आणली आहे. कॉर्पोरेट इन्वॉरमेंट रिस्पाँसिबिलिटी च्या माध्यमातून हरित भारत आणि हरित महाराष्ट्राचा विचार अधिक वेगाने पुढे गेला पाहिजे.

बांबू हा खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष आहे. याचा प्रत्येक भाग उपयोगाचा आहे. यात रोजगाराच्या प्रचंड संधी दडलेल्या आहेत हे लक्षात घेऊन शासनाने बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, बांबू विकास मंडळ स्थापन केले. बांबूला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केले. लोकसहभागातून होत असलेल्या या कामांमुळे वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादन, कांदळवन संवर्धन आणि संरक्षण, वनक्षेत्रातील जलसंपदा आणि बांबू लागवड या चार क्षेत्रात राज्य देशात पहिलं आलं. असे असले तरी इतकी झाडं का लावायची इथपासून मला त्याचा काय उपयोग असे विचारत शंका उपस्थित करणारे लोक ही आपल्याकडे आहेत. ही माणसं वृक्ष लावणाऱ्यांच्या मनात संदिग्धता निर्माण करतात. परंतू आपल्याला ही नकारात्मकता टाळून सकारात्मक भावनेने पुढे गेले पाहिजे असेही ते म्हणाले. मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशन ने तसेच सिंगल स्क्रीन थिएटरर्स मालकांनी हरित महाराष्ट्राचे संदेश, त्याविषयीचे छोटे माहितीपट चित्रपट सुरु होण्यापूर्वी किंवा मध्यंतरात दाखवावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीत हरित महाराष्ट्र आणि ग्रीन आर्मी संकल्पनेची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले. अभिनेत्री रविना टंडन यांनी वन विभागाच्या महावृक्षलागवडीचे तसेच यातील पारदर्शक कामाचे कौतूक केले. निर्माते सुभाष घई यांनी त्यांच्या इन्टिट्युट मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून हरित महाराष्ट्र, वृक्ष लागवड आणि वनांचे महत्व सांगणाऱ्या डॉक्युमेंटरीज, जाहिरातीवजा संदेश तयार करून त्या थिएटर्समध्ये दाखवण्याची व्यवस्था करू असे सांगितले. पर्यावरण रक्षण हा इमरजंसी कॉल असल्याचे सांगून सर्व नागरिकांनी वेळीच जागं होण्याची आवश्यकता निर्माते मुकेश भट यांनी व्यक्त केली. चित्रपटसृष्टीतील प्रत्येक नागरिकांनी किमान पाच झाडं लावावीत असे आवाहन किरण शांताराम यांनी यावेळी बोलतांना केले. मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन मध्ये पर्यावरण आणि वन संरक्षणाचे संदेश दाखवण्याची व्यवस्था करू असे श्री. चाफळकर यांनी यावेळी सांगितले.