महाराष्ट्र

सिरोंचात उपविभागीय पोलीस अधिकारी व महसूल विभाग एकमेकांविरुद्ध आमने – सामने !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा…सिरोंचा शहरात मागील 2 नोव्हेंबर ला येथील तहसील कार्यालयात घडलेल्या एका अश्लील शिवीगाळ प्रकरणी येथील पोलीस विभाग व महसूल विभाग एकमेकांविरुद्ध आमने सामने आल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली असून महसूल विभागाच्या काम बंद आंदोलनामुळे मात्र नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शासकीय कामात अडथळा आणत महसूल कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी करीत संपूर्ण जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करीत आहे. राज्य शासनाचे दोन्ही महत्वपूर्ण विभाग आमने सामने आल्याने यात नागरिकांची मात्र गैरसोय होत आहे.

प्राप्त माहितीनुसार 1 नोव्हेंबरला महसूल,वनविभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या कार्यवाहीत तेलंगणा राज्यातून मेडिगड्डा सिंचन प्रकल्पासाठी अवैध गौनखनिजाची वाहतूक करीत असताना 10 डंपर पकडून कारवाई करून डंपर सिरोंचा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

2 नोव्हेंबर ला सायंकाळी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे तहसील कार्यालयात येऊन अवैध डंपर वाल्यांची बाजू घेत तहसीलदार कार्यालयात उपस्तीत नसताना कार्यालयात कामावर असलेल्या कर्मचार्यांसमोर व नायब तहसीलदार समोर महसूल कर्मचारी व तलाट्याला अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत महसूल कर्मचाऱ्यांना पाहून घेण्याची धमकी दिल्याची आरोप झाले. या प्रकरणाची रीतसर तक्रार महसूल संघाने 3 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी यांना पाठवून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची मागणी केले.परंतु आजपर्यंत कारवाई न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात काल पासून कामबंद आंदोलन सुरू केले.

माफीनंतर हि महसूल कर्मचाऱ्यांकडून बदनामीचा प्रयत्न..राकेश जाधव उ.वि.पो

2 नोव्हेंबर ला घडलेल्या घटनेबद्दल आपली चूक नसतांना हि आपण महसूल कर्मचाऱ्यांची तहसीलदार समोर जाहीर माफी मागितली. मी कोणत्याही कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केलेला नाही महसूल विभागाच्या कर्मचारी माझावर खोटे आरोप करीत असल्याचे प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी दिली.

या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली असून या प्रकरणात प्रशासकीय यंत्रणेतील दोन्ही महत्वपूर्ण विभाग एकमेकांविरुद्ध आल्याने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामे करून घेतांना अडचण होत आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हयाचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रकरण निपटवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.