आपला विदर्भ

गडचिरोली जिल्ह्याचं विकासासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करू..ना..मुनगंटीवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

*अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आता चंद्रपूरसह गडचिरोली जिल्‍हयाचे पालकमंत्री*

राज्‍याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावर आता गडचिरोली जिल्‍हयाच्‍या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. दिनांक 5 जुलै 2019 रोजीच्‍या सामान्‍य प्रशासन विभागाच्‍या परिपत्रकानुसार सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावर गडचिरोली जिल्‍हयाच्‍या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. यापुढे सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्‍हयाचे पालकमंत्री म्‍हणून काम सांभाळतील. गडचिरोली या आदिवासी बहुल नक्षलप्रभावित जिल्‍हयाच्‍या विकासासाठी आपण सर्वशक्‍तीनिशी प्रयत्‍न करू अशी ग्‍वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

*विशेष सहाय्य विभागाचा अतिरिक्‍त कार्यभार*

अर्थ, नियोजन आणि वने या विभागांसोबत आता सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावर विशेष सहाय्य विभागाच्‍या मंत्रीपदाचा अतिरिक्‍त कार्यभार सोपविण्‍यात आला आहे. सामाजिक अर्थसहाय्याच्‍या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व संबंधित योजनांचे कार्यान्‍वयन विशेष सहाय्य विभागाच्‍या माध्‍यमातुन केले जाते. या विभागाच्‍या माध्‍यमातुन निराधार, वृध्‍द, दिव्‍यांग, विधवा, घटस्‍फोटिता, परित्‍यक्‍ता आदी वंचित व दुर्बल घटकांना देण्‍यात येणा-या अनुदानाच्‍या रकमेत वाढ करण्‍याचा निर्णय अर्थसंकल्‍पात नुकताच आपण जाहीर केला. प्रामुख्‍याने या आर्थिकदृष्‍टया दुर्बल घटकांचे अनुदान नियमित मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने आपण प्रयत्‍न करणार असल्‍याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.