आपला विदर्भ

सिरोंचाचे संवर्ग विकास अधिकारी उंदिरवाडे यांच्या विरुद्ध पंचायत कर्मचाऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर कामबंद आंदोलन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….सिरोंचात बीडीओ विरोधात पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी आक्रमक, कामबंद आंदोलन सुरू

##################### सिरोंचा ता प्र :- महाराष्ट्र सिरोंचा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने एल्गार पुकारला आहे. महासंघाच्या सिरोंचा तालुका शाखेच्या नेतृत्वाखाली स्थानिक पंचायत समितीत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात आंदोलनकर्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खासदार अशोक नेते व तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले की, सिरोंचा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे हे मनमानी पद्धतीने पंचायत समितीचा कामकाज चालवत आहेत. ते अधिकारी-कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागतात, शिवीगाळ व अरेरावी करीत असतात असा आरोप या निवेदनात करण्यात आला असून निवेदनात संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या विरोधात तब्बल 26 मुद्यांच्या समावेश केले आहे ,महासंघाने आक्रमक भूमिका घेत उंदिरवाडे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी , यासाठी १५ जूनला जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महासंघातर्फे निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर आजपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शारीरिक अंतर पाळून आणि कोरोनाची सर्व कामे करून हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. या आंदोलनात पी. आर. कोपनर, एस. जे. निमसरकार, ए. के. बंडावार, डी. डी. पोरटे, एल. एस. कुमरे, डी. जे. पारधी यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. गट विकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, उंदिरवाडे हे यापूर्वी गडचिरोली पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. येथेही त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. आज जिल्ह्याचे खासदार अशोक नेते हे सिरोंचा दौऱ्यावर आले असता महासंघाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटून निवेदन सादर केले.
तसेच तहसीलदार रमेश जसवंत व पंचायत समितीचे सभापती सत्यम मोडेम व उपसभापती कृष्णमूर्ती रिककुला यांना निवेदन सादर करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *