आपला विदर्भ

राज्यात शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही-कृषीमंत्री दादाजी भुसे

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

राज्यात शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही – कृषी मंत्री,दादाजी भुसे

जिल्हयातील प्रगतशील शेतकरी गजेंद्र ठाकरे यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार

गडचिरोली : जिमाका – राज्यातील खरीप व रब्बी हंगामादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याला आवश्यक बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी गडचिरोली येथे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिला. ते वडसा तालुक्यातील नैनपूर येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन प्रत्यक्ष बांधावर जावून, कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. त्यानिमित्त आज दादाजी भुसे मंत्री, कृषी व माजी सैनिक कल्याण यांचे उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन नैनपूर येथे करण्यात आले होते. जिल्हयातील नैनपूर गावाचे शेतकरी गजेंद्र ठाकरे यांच्या शेतावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गजेंद्र ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते काळा भात बियाणाचा जिल्हयात प्रवर्तक केल्या मूळे करण्यात आला. यावेळी मंत्री महोदयांनी ठाकरे यांचे कौतूक करून या प्रकारे शेकडो शेतकरी तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. नैनपूर येथे आरमोरी मतदार संघाचे आमदार कृष्णाजी गजबे, भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर, वडसा नगराध्यक्षा शालुताई दंडवते, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, माजी आमदार मडावी, आनंदराव गेडाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, डॉ.कराडे, प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली तानाजी खर्डे विभागीय कृषी अधिकारी वडसा, विशाल मेश्राम उपविभागीय अधिकारी वडसा, दिशांत कोळप कृषी विकास अधिकारी गडचिरोली, निलेश गेडाम तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात खरीप हंगामात 16 लक्ष क्वींटल बियाणांची आवश्यकता आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्यात 17 लक्ष बियाणांची व्यवस्था केली आहे. राज्यात ७० टक्के पेरण्या झालेल्या आहेत. उर्वरीत पेरण्याही लवकरच पूर्ण होती असे मंत्र्यांनी उपस्थितांना माहिती दिली. पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी या करीता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी कृषी संजीवनी सप्ताहा दरम्यान प्रत्यक्ष बांधावर जावून मार्गदर्शन करत आहेत. याचा फायदा तळागाळातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कृषी दिनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, स्व.वसंतराव नाईक यांनी विकासाला वळण देणाऱ्या योजना राबविल्या त्यामूळे आपण त्यांचा आदर्श म्हणून १ जुलै कृषी दिन म्हणून साजरा करतो. या पार्श्वभूमिवर कृषी सप्ताहाच्या माध्यमातून प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, शासनाच्या योजना सर्वापर्यंत पोहचविल्या जाणार आहेत.
गडचिरोली जिल्हयात माझी तिसरी भेट आहे असे मंत्र्यांनी सांगून मला येथील अडचणी लक्षात येत आहेत व त्या मी सोडविण्यासाठी राज्यस्तरावर नक्की प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, गुणवत्ता वाढविणे यासाठी जिल्हयात चांगले उपक्रम राबविले जाणार आहेत असे ते म्हणाले. या पाठीमागे शेतकऱ्यांचे जिल्हयात मोठे नुकसान झाले होते. याची भरपाई मागणी द्या असे निवेदन आले आहे. मी याबाबत लवकरच राज्यस्तरावर प्रश्न मांडणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना गट शेती करण्याचे आवाहन : मंत्री दादाजी भूसे यांना शेतकऱ्यांशी संवाद साधताना गट शेती व फार्मर प्रडयूसर कंपन्यांच्या माध्यमातून शेती करा व विकास साधा असे आवाहन केले. गट शेतीमधून शेतकरी बळकट होत आहेत. तसेच फार्मर प्रडयूसर कंपन्यांच्या माध्यमातून प्रगत शेती करा असे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमानंतर त्यांनी वडसा येथील आंतर जी जी या गावातील लक्ष्मी कृषी उद्योगाला भेट दिली. शेतकरी हरीश माने व इतर उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.

सायंकाळी सोनापूर गडचिरोली येथील कृषी चिकित्सालय रोपवाटिका या ठिकाणी भेट देणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागा बरोबर बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *