आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

आठ बाय आठच्या खोलीत राहणाऱ्या रेखा मगदूमची सीए परीक्षेत उत्तुंग झेप

सांगली : मिरजेतील रेवणी गल्ली परिसरात आठ-बाय आठच्या एका लहानशा पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या रेखा संजय मगदूम हिने चार्टर्ड अकाऊंन्टट परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. परिस्थितीशी संघर्ष करत तिने मिळवलेल्या या यशाबाबत तिचे कौतुक होत आहे.

मिरजेतील रेवणी गल्ली परिसरात आठ बाय आठच्या एका लहानशा पत्र्याच्या खोलीत रेखा आणि तिची आई शकुंतला राहते. रेखा दीड वर्षाची असताना तिच्या वडिलांनी अचानक घर सोडले. यामुळे तिची आई शकुंतला यांना मोठा धक्का बसला. मात्र, खडतर परिस्थितीचा सामना करत त्यांनी रेखाचे संगोपन केले.

लोकांच्या घरोघरी जाऊन धुण्या-भांड्यांची कामे करीत, रेखाचे शिक्षण सुरु ठेवलं. सहावीपर्यंत शिक्षण झालेल्या शकुंतला यांनी अतिशय कमी उत्पन्न असतानाही लेकीच्या शिक्षणासाठी खर्च करण्यास मागे-पुढे पाहिलं नाही. रेखानेही परिस्थितीवर मात करत आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. पण रेखाचा महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च वाढत गेला.

मात्र, तरीही आईने तिच्या शिक्षणाला काही कमी पडू दिले नाही. रेखाची शिक्षणातील प्रगती पाहून, मिरजेतील प्रा. संजय कुलकर्णी व प्रा. अभ्यंकर यांनी तिला चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केले. रेखाने चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेत यश संपादन केले.

गेल्या २५ वर्षांपासून धुणी-भांडी करणाऱ्या आईला चांगले दिवस दाखवण्याचे तिचे स्वप्न आहे. रेखाला सनदी लेखापरीक्षक म्हणून चांगली नोकरी मिळण्याची प्रतिक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *