राज्य

विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे 25 डिसेंबर ला लोकार्पण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …….भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नांव बॉटनिकल गार्डनला देणार.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला अपुर्ण वनप्रकल्‍पांचा आढावा.

जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश.

वनमंत्री पदाच्‍या गेल्‍या टर्ममध्‍ये मंजूर चंद्रपूर जिल्‍हयातील अपूर्णअवस्‍थेत असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करावे यासंदर्भात असलेल्‍या अडचणींचे तातडीने निराकरण करावे, प्रामुख्‍याने चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी म्‍हणजे २५ डिसेंबरला लोकार्पित करण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक नियोजन करावे असे निर्देश वन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

दिनांक ९ सप्‍टेंबर रोजी चंद्रपूरात घेतलेल्‍या आढावा बैठकीत वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वरील निर्देश दिले. वनविभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्री. वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वनमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील महत्‍वपूर्ण वनप्रकल्‍पांचा आढावा घेतला.

विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी

चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण दिनांक २५ डिसेंबर रोजी श्रध्‍देय अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी करण्‍याचे नियोजित असून यादृष्‍टीने आवश्‍यक तयारी पूर्ण करण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले. ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पामुळे चंद्रपूर जिल्‍हयाला पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विशेष महत्‍व आहे. ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाला भेट देण्‍यासाठी देश-विदेशातील पर्यटक वर्षभर येत असतात. देशातील अत्‍याधुनिक बॉटनिकल गार्डन जवळच विसापूरमध्‍ये तयार होत असल्‍याने या गार्डनला देश-विदेशातील पर्यटकांनाही भुरळ पडणार आहे. वनसंपदा व वनेतर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्‍यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्‍यासक, विद्यार्थी या गार्डनला भेट देतील. या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्‍हणून पुढे येतील. त्‍यामुळे जिल्‍हयातील आदिवासी व गरीब लोकांचे जिवनमान उंचावण्‍यासाठी मदत होणार आहे. या बॉटनिकल गार्डनचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे. बॉटनिकल गार्डन, कन्‍झर्वेशन झोन आणि रिक्रीएशन झोन अश्‍या तीन विभागामध्‍ये उद्यान तयार होत आहे. या बॉटनिकल गार्डनला भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नांव देण्‍यात येणार असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.

ताडोबात टायगर व बिबट सफारी सुरू करणार

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प हे उत्‍तम पर्यटन स्‍थळ म्‍हणून जगाच्‍या नकाश्‍यावर यावे यादृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत. यादृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत. ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात टायगर व बिबट सफारी सुरू करण्‍याचा प्रकल्‍प अपूर्णावस्‍थेत आहे. टायगर व बिबट सफारीच्‍या माध्‍यमातुन येथे येणा-या पर्यटकांना वन्‍यजीव दर्शनाची विशेष सोय उपलब्‍ध होणार आहे. यादृष्‍टीने देखील जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.

बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करा

चंद्रपूर जिल्‍हयातील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा रोजगार निर्मितीच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण प्रकल्‍प आहे. या प्रकल्‍पाच्‍या ठिकाणी बांबु कामावर फायर रिटारडंट पॉलीश करणे, आग प्रतिबंधक योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्‍वयंपाकगृह इमारतीचे बांधकाम करणे तसेच विद्युत विषयक कामे आदी प्रलंबित आहेत. यासाठी नुकताच १४ कोटी रू. निधी मंजूर झालेला आहे. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

वनअकादमी पूर्ण क्षमतेने पुढे नेण्‍याबाबत कार्यवाहीचे निर्देश

चंद्रपूर येथील वनप्रशासन विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी अर्थात वनअकादमीशी संबंधित कामांना गती देत पुढे नेण्‍याची आवश्‍यकता आहे. वनअकादमीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्राच्‍या निर्मितीची आवश्‍यकता आहे. अकादमीतील रिक्‍त पदांची भरती करणे सुध्‍दा गरजेचे आहे. वनअकादमीचे वनविद्यापीठात रूपांतर करण्‍याच्‍या दृष्‍टीने समिती नेमून त्‍यादृष्‍टीने जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. देशातील अत्‍याधुनिक अशा स्‍वरूपाची ही वनअकादमी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण व्‍हावी असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

वनविभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्री. वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वरील विषयांवर विस्‍तृत चर्चा झाली. हे प्रकल्‍प जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कालबध्‍द कार्यक्रम तयार करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी यावेळी दिले. दर पंधरा दिवसांनी चंद्रपूरला येवून सचिवांनी या प्रकल्‍पांबाबत आढावा घेण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close