अर्धरात्री भूमिपूजन केलेल्या सिरोंचा येथील बसस्थानकाची बांधकाम आजही अर्धवटच !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क… रवी सल्लम सिरोंचा
सिरोंचा….तालुक्यातील इंद्रावती,गोदावरी व प्राणहिता या तीनही नद्यांवर पुलांचे बांधकाम पूर्ण झाल्याने सिरोंचा शहर हे छत्तीसगड,तेलंगणा आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यातील प्रवाश्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण ठरत आहे.सिरोंचा येथील बसस्थानकावरून दररोज एक ते दीड हजार प्रवासी तेलंगणा व छत्तीसगड ला बसेस व खाजगी वाहनाने प्रवास करीत असतात.सिरोंचा शहरासाठी नवीन बसस्थानक मंजूरीसाठी येथील नागरिकांनी अनेकदा सरकारला निवेदने दिले. यासाठी आजी माजी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्यापरीने प्रयत्न ही केले.मात्र सिरोंचा येथील नवीन बसस्थानकाला मंजुरी भाजप शिवसेना या युती सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या अंबरीशराव आत्राम यांच्या आमदारकीचा कार्यकाळात मिळाली.या बसस्थानकाच्या बांधकामासाठी सत्ताधारी भाजप शिवसेना सरकारकडून तब्बल दोन कोटी सत्तावीस लक्ष रु .निधीला ही मंजुरी मिळाली होती.संबंधित विभागाला निधी प्राप्त झाल्याने बसस्थानकाची भूमिपूजन माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांनी सप्टें.2019 च्या विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागण्यापूर्वी एक दिवस अगोदरच का होईना पण अर्धरात्री भरपावसातच उरकवला होता.
या बसस्थानाकाची भूमीपूजनानंतर काही दिवस बांधकामाला सुरुवात ही झाली. त्यात मध्यंतरी कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे बांधकाम ठप्प पडला होता.मात्र कोविड -19 नंतर तरी बसस्थानकाच्या बांधकामाला सुरुवात होण्याची नागरिकांना अपेक्षा होती,परंतु कामाला सुरुवात न होता याबसस्थानकाची गती आजही ” जैसे थे ” स्थितीतच आहे.2019 नंतर राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले.अन त्यांची सत्ताही उलटली मात्र बसस्थानकाची बांधकामाला सुरूवात झालेली नव्हती.परत राज्यात सत्तांतर होऊन भाजप व शिंदे गटाची सरकार अस्तित्वात आली.सिरोंचा येथे नवीन सुसज्ज असे नवीन बसस्थानकाची नितांत गरज असून आजच्या घडीला बसस्थानकाची बांधकाम अर्धवट असल्याने प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.भाजप- शिवसेना या युती सरकारच्या काळात मंजूर झालेल्या या बसस्थानकाची बांधकामासाठी किमान आता तरी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन बसस्थानकाची बांधकाम पूर्णत्वास नेण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.