सिरोंचा नगरपंचायत मध्ये वातानुकूलीत शवपेटिकेची सुविधा…!तालुका काँग्रेस कमिटीच्या मागणीला आलंय यश…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी…
सिरोंचा नगर पंचायतमध्ये अखेर वातानुकूलित शवपेटिकेची (एसी शवपेटी) सुविधा उपलब्ध झाली आहे. स्थानिक नागरिकांची ही अनेक वर्षांची मागणी होती, कारण सिरोंचा तालुक्याचे हवामान प्रामुख्याने दमट असून, शववहनाच्या प्रक्रियेसाठी अत्यंत अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः उन्हाळ्यात किंवा विलंबाने अंत्यसंस्कार करायचे झाल्यास, मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी वातानुकूलित शवपेटीची नितांत आवश्यकता होती.
ही समस्या ओळखून काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे सातत्याने मागणी लावून धरली. स्थानिक लोकांना या सुविधेसाठी तेलंगणातील सीमावर्ती भागांतून शवपेटी आणावी लागत असे. त्यामुळे वेळेचा अपव्यय होई, शिवाय मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्चही व्हायचा. आप्तस्वकीयांना मृतदेह विलंबाने मिळत असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
काँग्रेस कमिटीने याबाबत नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्याशी बैठक घेतली आणि वातानुकूलित शवपेटीची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी केली. उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले व या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आणि नगर पंचायत प्रशासनाने सिरोंचा येथे वातानुकूलित शवपेटी उपलब्ध करून दिली.
शहरातील आणि परिसरातील नागरिकांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आता अंत्यसंस्कारासाठी मृतदेह योग्य तापमानात संरक्षित ठेवता येणार असल्याने, अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुलभ होईल. विशेषतः दूरच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी पोहोचण्यास वेळ लागत असल्यास, ही सुविधा मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरणार आहे.
नगर पंचायत प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्वरित शवपेटी उपलब्ध करून दिल्याने, स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ही सुविधा उपलब्ध होऊ शकली. अनेक सामाजिक संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
बबलू पाशा यांनी पदभार स्वीकारल्यावर सिरोंचा नगर पंचायत मध्ये शेववाहीका नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले. व वातानुकूलित शवपेटी ही स्थानिकांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. वेळेवर घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा फायदा होईल. भविष्यात अशाच आवश्यक सेवांसाठी प्रशासनाने तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.