सिरोंचा तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्रे सुरु करा…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी..
सिरोंचा…..तालुक्यात शेतकरी रब्बी हंगामात उन्हाळी धानपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या पिकाच्या मळणीचे काम पूर्ण होत आहेत. मात्र,तालुक्यात एकही ठिकाणी अद्याप आधारभूत धान खरेदी केंद्र अजूनपर्यंत सुरू करण्यात आले नाही. परिणामी, पैशाअभावी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, काही शेतकऱ्यांना पैशांची तातडीची आवश्यकता असल्याने धान खरेदी केंद्राअभावी खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विक्री करावी लागते ,शासनाने तालुक्यातील सिरोंचा, अंकीसा, आसरअल्ली, झिंगानुर, रेगुंठा, टेकडा, बामणी, रंगय्यापल्लीसह ग्रामीण भागात लवकरात लवकर उन्हाळी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे. येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेती लागवड करण्यासाठी लागणारे विविध साहित्य कृषी केंद्रामधून
विकत घेऊन न्यावे लागते. मात्र अजूनपर्यंत महामंडळाच्या वतीने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाही. पावसाळ्यात शेती लागवडीसाठी लागणारे विविध साहित्य विकत आणायचे कसे, असे संकट शेतकऱ्यांना येऊ नये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्यांचा विचार करून तालुक्यातील धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी आणि आमदार तथा खासदार यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले आहे,