पहिल्याच पावसात भामरागड ते आरेवाडा मार्गावरील पुलासह रस्ताही खचला… !
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..प्रतिनिधी..
अहेरी :अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या भामरागड तालुक्यातील भामरागड ते आरेवाडा या मार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पहिल्याच पावसात पुलासह कडेला असलेल्या रस्ताही खचला आहे.याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
अविकसित भामरागड तालुक्यात अनेक विकास कामे होत आहेत.तालुक्यातील छोट्या मोठ्या नाल्यावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे.मात्र भामरागड ते आरेवाडा मार्गावर असलेल्या एका नाल्यावर काही महिन्यापूर्वी बांधण्यात पुलाचे बांधकाम करण्यात आले.सदर पूल काल झालेल्या पहिलाच पावसात वाहून गेल्याचे चित्र आहे.सदर पूला लगतचा मलबा पहिल्याच पावसात खचलेला आहे. त्यामुळे या पुलावरून नागरिकांना वाहतूक करणे धोक्याचे ठरले आहे.
पहिल्याच पावसात पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्याने सदर पुलाचे काम कितपत चांगले आहे,सदर कामाचा दर्जा हा आता दिसून येत आहे. सदर बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.