गोल्लाकर्जी ते रेपनपल्लीपर्यंतची रस्त्याची काम अपूर्णच… नागरिकांना होत आहे नाहक त्रास…. कंकडालवारांनी दिली आंदोलनाचा इशारा….!

अहेरी : गेल्या अनेक महिन्यांपासून गोल्लाकर्जी ते रेपनपल्ली या मार्गावर रस्त्याचे काम रखडले असून गिट्टी टाकूनच काम थांबवले गेले आहे.या गिट्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांसाठी हा रस्ता डोकेदुखी ठरत आहे.प्रशासनाच्या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून जर त्वरित कामाला सुरुवात झाली नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी समंधित विभागाला दिला आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गिट्टी टाकलेली असून या गिट्टीमुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात घडत आहेत.अनेक नागरिक आणि वाहनचालकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. सतत होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.केवळ वाहतूकच नाही,तर या रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे स्थानिकांना श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत.सततच्या धुळीमुळे लहान मुले आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. दुकानदार व प्रवासी देखील या समस्येने हैराण झाले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या कामासाठी वारंवार मागणी करण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे कामाला सुरुवात न केल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याची इशारा काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार दिली आहे.