अहेरी परिसरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड, वेळेवर जेवण मिळत नसल्याची रुग्णांची ओरड….!
विदर्भक्रांती नेटवर्क…प्रतिनिधी…
अहेरी : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे आधीच धिंडवडे उडाले असतांना आता पुन्हा अहेरी परिसरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होतांना दिसून येत आहे. रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याची ओरड होत असल्याने अधिकारी व कंत्राटदारांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
अहेरी परिसरातील ग्रामीण रुग्णालयात वेळेवर रुग्णांना जेवण,नाष्टा तसेच रुग्णालयामार्फत देण्यात येणारे जेवण वेळेवर मिळत नसल्याची ओरड आहे.रुग्णालयात रुग्णांना जेवण मिळण्याचे वेळापत्रक फलक लावलेले असते मात्र त्या वेळापत्रकानुसार रुग्णांना जेवण मिळत नाही अशी तक्रार काही नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे केली होती.
दरम्यान अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी,सिरोंचा,भामरागड, एटापल्ली, मूलचेरा या चार तालुक्यातील शासकीय रुग्णालयामधे रुग्णांना वेळेवर नास्ता,चहा,पाणी,अंडा,जेवण, मिळत नाही त्यामुळे सबंधित अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमत करून कोट्यवधी निधी काढलेला आहे.
त्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून रिकव्हरी करण्यात यावी तसेच रुग्णालयात रुग्णांना वेळेवर जेवण, व इतर सेवा पुरवावी अशी मागणी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.