सिरोंचा-आल्लापल्ली मार्गावर ओढावणार पुन्हा तिच स्थिती …?
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी…
गडचिरोली ब्युरो.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आलापल्ली-सिरोंचा या मार्गाचे काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहे. मात्र अद्यापही या रस्त्याची दैनावस्था कायम असतांना अवजड वाहनांची रेलचेल कायम आहे. मागील वर्षी याच महामार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकांचे बळी गेले होते. यादरम्यान सदर मार्ग अवजड वाहतूकीसाठी बंद करण्याची दोन डझनभर ग्रापंची मागणी तत्कालीन जिल्हाधिकारींनी मान्य करीत काही महिन्यांसाठी बंद केली होती. काही दिवसातच पावसाळ्याला सुरवात होणार असल्याने अवजड वाहतूकीमुळे या रस्त्याची दैनावस्था होऊन अपघात बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता सदर मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक काही कालावधीसाठी बंद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
पावसाळ्याला काही कालावधीत सुरुवात होणार आहे. सद्यस्थिती आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय मार्गाचे काम सुरु आहे. मात्र कामाच्या संथगतीमुळे अद्यापही रस्त्याची दैनावस्था कायम आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ सुरु असते. पावसाळ्याच्या कालावधीत सदर मार्गावरील दैनावस्थेमुळे वाहने फसणे, अपघात, शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना मनस्ताप होण्याची संभाव्यता आहे. मागील वर्षी या मार्गावर रस्त्याच्या चाळणमुळे अपघातात अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. वाढते अपघात लक्षात घेत मागील या मार्गावर येणा-या दोन डझनभर ग्रामसभांनी ठराव घेत सदर मार्ग अवजड वाहनांसाठी काही कालवधीकरीता बंद करण्याची मागणी लावून धरली होती. याचा पाठपुरावा करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असता तत्कालीन जिल्हाधिका-यांनी काही कालावधीकरीता या मार्गावरील अवजड वाहतूक तीन ते चार महिन्यासाठी बंद ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. यामुळे अपघातास मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आले होते. याच निर्णयाप्रमाणे जिल्हाधिकारींनी पावसाळ्याच्या कालावधीत या मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवून होणारे अपघात टाळावे, तसेच राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून कामाला गती द्यावी, अशी मागणी ताटीकोंडावार यांनी पत्रकातून केली आहे.